गुरुवार, 15 नवंबर 2012

अफवा, सत्यता आणि धाडस

माझ्या एका मैत्रीणीचा मी घेतलेला इंटर्वह्यू. आसामवासीयां विरुध्द अफवांची झोड उठली होती. मुलगी असूनही या मुलीने मुंबई सेफ असल्याचं आपल्या इथेच राहण्याने सिध्द करुन दाखवलं.

इंटर्न



इंटर्न
मी पहिल्यांदाच मुंबईत आलो होतो. एका न्यूज चॅनलमध्ये माझी इंटर्नशिपसाठी निवड झाली होती. पत्ता शोधत शोधत ऑफिसपर्यत पोहोचलो. मला ते गावंच वाटलं. ड्रायव्हर ऑफीसच्या बिल्डिंगबाहेरच गावकुसाबाहेर(चावडीवर) लोक असतात तसे बसले होते. आत जो जोस्टुडियोपर्यंत जावं तोतो गावातली उतरंड भेटत राहते, त्यातल्या आडनावासकट.
एच आरचं ऑफिस तिस-यामाळ्यावर आहेना. मी खाली बसलेल्या एका ड्रायव्हर कडून कन्फर्म करून घेत होतो. त्यानी पहिल्याच नजरेत ओळखलं. विचारलं, इंटर्न का?’  मी हो म्हटल्यावर पुढची चौकशी सुरु झाली. कोण, कुठून आलास, कोणी वशीला लावला तुझा ? मी त्यांच्या प्रश्नांना बगल देत म्हटलं, मला आज संदीप सरांनी भेटायला बोलवलंय, दहा वाजता. मी वर गेलो तिस-या मजल्यावर रजिस्टरमध्ये रीतसर सही केली. पुन्हा ऑफिसातल्या वॉचमननी तेच खालचे प्रश्न विचारले. मी तीच उत्तरं दिली. आणि रिसेप्शनिस्टसमोर उभा राहिलो. समोर कोणीच नाहिये या थाटात त्या फोनवर बोलत होत्या. मला मी थोडावेळ मिस्टर इंडिया झाल्यासारखा वाटलो. मी एकदा एक्सक्यूझ मी म्हटलं. रिसेप्शनिस्ट मॅडमनी डोळ्यांनीच थांबायचा इशारा केला. त्यांचं बोलून झाल्यावर त्यांनी मला कोणाला भेटायचंय, कोणी पाठवलं इत्यादी प्रश्न विचारले. मी परत पाठ केल्यासारखी उत्तरं दिली. मग त्यांनी एचआर डिपार्टमेंटला फोन केला आणि मला दिला.
हॅलो, समोरून एका महिलेचा आवाड आला. मी, गुडमॉर्निंग मॅम,
एचआर मॅडम, हां कुणी पाठवलं तुला ? ‘
मी संदीप सरांनी, ते आमच्याकडे गेस्ट लेक्चरर.....
हां, बस बस जरा वेळ मी बोलवते तुला, एचआर मॅडम मॅडम म्हणाल्या. जरा वेळाने मी धीर करून विचारलं, व्हेअर इज वॉशरुम ?’ एक्सेसशिवाय आत जाता येत नव्हतं म्हणून एका वॉचमननी दार उघडून दिलं. मी फ्रेश झालो. बाहेर आलो तर माझ्यासाठी निरोप होता. लॅपटॉपवरची एक नजर माझ्यावर टाकून एचआर मॅडमनी समोर बसायला सांगितलं. मी रिझ्यूम दिला. मग नाव काय, काय करतोस, हे सगळं रिझ्यूम मध्ये लिहलेलं असूनपण परत विचारलं. पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण, हा सोप प्रश्न विचारला. डिफेन्स मिनिस्टर कोण, आत्ताच एका महान सिनेअभिनेत्याचंनिधन झालं, त्यांच्याबद्दल सांग. मी दणादण सांगत गेलो. मग वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांची नावं विचारली. ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आठवलं नाही. मी आठवून बघीतलं, पण काही उपयोग झाला नाही. त्यावर एचआर मॅडम म्हणाल्या, तुला एवढंपण प्रिपेअर करुन येता आलं नाही का ?’ त्यांनी आतमध्ये इनपूट हेड सरांकडे पाठवलं. मी अंदाज बांधला की आता पुन्हा ते बौध्दिक घेतील, पण तसं काही झालं नाही. आणि माझं सिलेक्शन झालं. त्यांनी मला दुस-या दिवशी सकाळी दहा वाजता जॉइन करायला सांगितलं.
दुस-या दिवशी माझ्यासारखेच आणखी इंटर्न हजर होते. एकुण आम्ही दोन मुलं आणि दोन मुली. त्यांनाही जॉइन होऊन जेमतेम एक दोनच आठवडे झाले होते. तुझं नांव, माझं नाव विचारून झालं. त्यातल्या एकीची इंटर्न संपत आली होती. ती आमची गाईडच होती. ती तिचे अनुभव न विचारता सांगायची. तिचं नाव अनंन्या खरे. राहणं बोरिवलीला. डेस्क वरच्या मॅडमला गुडमॉर्निंग म्हणालो त्या म्हणाल्या, टाइम्स नाऊवर टीकर चालले आहेत, ते लिहून काढ. मला वाटलं असंच काहितरी असेल, पण मी लिहून काढलेली बातमी आमच्या चॅनलच्या बातमीमध्ये भर घालणारी ठरली. मला मी काहीतरी मोठं काम केल्या सारखं वाटलं. मनोमन मी सुखावलो.
मॅडम सकाळी सात ते तीन च्या शिफ्टला आल्या होत्या. मी कामात असतानाच त्यांनी मला चहा घ्यायला सांगितलं. त्या कोणती ओबी कुठे आहे, हे माहीत करून घेत होत्या. माझ्या सोबतचा माझा इंटर्न मित्र दीपक लांडगे एडिटींग डिपार्टमेंटला बसला होता तर प्रज्ञा थोरात प्रोमो बनवून घ्यायला. अनंन्या एंटरटेंण्मेंटच्या शूटला गेला होती. तिला बॉलीवुडचं वेड. तर संदीपला त्यात बिल्कूल रस नसायचा. तो म्हणायचा त्याला नाना पाटेकर आणि अशोक सराफ सोडून कोणी माहीत नाहीत.
मी चहा संपवत असतानाच दीपक म्हणाला, चल जरा खाली जाऊन येऊया.
मी म्हटलं, थांब मॅडमला विचारतो. आमचं संभाषण मॅडमनी एकलंच होतं. त्यांनी विचारण्याआधीच सांगितलं, जा लगेच दहा मिनिटांत ये. लिफ्टमध्ये आम्ही काहीच बोललो नाही. खाली टपरीवर गेल्यावर त्याने पाच रुपये पानवाल्याला दिले. पानवाल्याने त्याला गोल्डफ्लेक प्रिमिअम काढून दिली. संदीपनी इशा-यानेच विचारले. मी पित नाही म्हणालो. ऑफिसच्या वातावरणात सिगरेट पिणं म्हणजे मला इभ्रतीसोबत खेळणंच वाटलं.
अरे,वरती कोणाला तोंडाचा वास आला तर, असं मी त्याला विचारलं.
त्यावर तो म्हणाला, इथे बातम्यांचा वासपण लोकांना दुस-या चॅनलवर बातमी दिसल्यावर लागतो, तिथे आपल्या तोंडाचा वास कोण घेणार. आम्ही दोघेही या जोकला जोरदार हसलो.
सकाळ पासून कुठे बसला होतास, असं मी विचारलं. अरे, जरा कामाचं शिकून ठेवायचं. इथे असाइनमेंट डेस्कला बसून काही होणार नाही. मीडियामध्ये आल्यासारखं काहीतरी वेगळं शिकून ठेवायचं. आपण बापजन्माततरी आयमॅकचा काँम्पुटर घेणार आहोत का, मग आजच त्यावर काय काय सॉफ्टवेअर आहेत, ते शिकून ठेवायंच. साला या सॉफ्टवेअरचीपण बरीच लफडी असतात. त्याच्या आणखीन टेक्नीकल बोलण्यातलं मला काहीच कळालं नाही.
दुपारी जेवायची वेळ झाली. कँटिनमध्ये सगळे सोबत जेवायला बसलो. मी डबा आणला नव्हता. मग काय करणार, दिपकनं विचारलं, मी म्हटलं कँण्टिन आहे ना आपलं, तो उदास हसला. मी, दीपक आणि प्रज्ञा सोबतच बसलो होतो.अनंन्या शुटवरंच होती. जेवताना आम्हाला मनसोक्त गप्पा मारता येत होत्या. कारण पुढे टेलिशॉपिंगचा प्रोग्राम अजून एक तास करी चालणार होता. त्यामुळे सगळे कसे रिलॅक्स होतो. प्रज्ञा तशी मुंबईतलीच इथल्याच एका कॉलेजात बीएमएमच्या थर्ड इयरला जाणार होती.
काही तरी विचारायचं म्हणून मी विचारलं, काय स्पेशलायझेशन आहे थर्ड इयरला ? ती म्हणाली, अँडव्हर्टायझिंग घेतलंय. मग इथे जर्नालिझममध्ये इंटर्न.... ?’ इंटर्नशिपमुळेच ठरवलं अँडव्हर्टायझिंगमध्ये जायचं. सगळे हसायला लागले. नेमकं काय झालं ?’  माझा आणखि एक स्वाभाविक प्रश्न. प्रज्ञा दीपक एकदम म्हणाले, कळेल तुलापण. सगळे हसायला लागले. मी जेवायला सुरवात केली. मध्येच मॅडम येऊन गेल्या. मी सौजन्य म्हणून जेवायला बोलवलं. त्यांनी चालू द्या म्हणत फोन कानाशी धरत दुसरं टेबल पकडलं. मला प्रज्ञाचा निर्णय कळत नव्हता. मी पुन्हा विचारलं, प्रज्ञा तुला जर्नालिझम का नकोय ?’
 संदीप आणि मी इथे आलो तेव्हा मी अँकर बनायचं स्वप्न बघत होते. मग इथली धावपळ बघून मी निर्णय बदलला. हे काय आपलं काम नाही. आपली जाहिरात एजन्सी झिंदाबाद. परत माझा लूक एवढा काही खास नाही. ब-याचदा आपले अँकर अकलेचे तारे तोडतात. समोर चर्चेला बसलेले एक्सपर्ट त्यांची ऑफ एअर आल्यावर घेतात. बाकीच्या गोष्टी तू बघशीलंच.
आता माझी उत्तरं द्यायची वेळ होती. प्रश्न होता, मी इथे कसा ? निबंध स्पर्धेत कायम नंबर काढायचो. एकांकिका वैगेरे लिहायचो. मग आमच्या बागवेसरांनी सांगितलं बीकॉम न करता पत्रकारितेचा नव्यानं सुरु झालेला कॉर्स कर. मी इथे टिव्ही च्या आकर्षणानी आलेलो नाही. ते संदीप सुरवसे सर आहेत ना, स्पेशल करस्पाँण्डंट, त्यांनी सांगितले तुमच्यात क्षमता असेल तर टिव्ही वाल्यांना तुमची दखल घ्यावीच लागेल. ते आमच्याकडे नागपूरला गेस्ट लेक्चरंर म्हणून आले होते.
प्रज्ञानी विचारलं तुला काय व्हायचंय, आपल्याला पण स्पेशल करस्पाँण्डण्ट व्हायचं आहे. आपला राजकारण, समाजकारणावर दणदणीत अभ्यास आहे. संदीप सर आपले रोल मॉडेल आहेत. ते मुळचे मुंबईचे पण मिदनापुरला ट्रेन उलटवली नक्षल्यांनी त्यावेळेला सगळे न्युजचॅनल त्यांनाच फॉलो करत होते. त्यावेळेला कसे संदीप सुरवसेच हर जगह छाये गये थे.
लेक्चरनंतर मी त्यांना भेटलो. बरेच प्रश्न विचारले. इंटर्नशिप करायची इच्छा सांगितली. त्यांनी विचारलं, मुंबईला कोण आहे का तुझं ?’ मी म्हटलं माझे चुलते पोट्रस्ट कॉलनीत राहतात वडाळ्याला. त्यांनी मला एचआरचा नंबर आणि ईमेल आयडी दिला. झालं. पण, इथे काका नाखुशंच आहेत. ते म्हणतात, गप्प मास्तरकी कर. हे सगळे मार खायचे धंदे आहेत. मी फेमस डायलॉग मारला. शिवाजी शेजारच्याच्याच घरात जन्माला यायला हवा का ? काका गप्पच झाले, ते म्हणाले आत तू पत्रकार झालास आम्ही काय बोलणार, तेव्हापासून ते मला पत्रकार अविनाश खोब्रगडे म्हणतात. जेवण उरकतच मी दीपकला विचारसं तुझं काय ? दीपकने त्याची स्टोरी सांगितली. तो मुंबईत फोटग्राफी शिकायला आला होता. पण जेजे ला अँडमिशन मिळालं नाही म्हणून बीएमएम करतोय. पण त्याचं खंर सांगायचं तर बीएमएम सोबतच त्याचा मीडायातला इंट्रेस्टपण संपत चाललाय. न्यूजरुममध्ये आम्ही मॅडमनी दिलेलं काम करत होतो.
तितक्यात अनंन्या आली. ती धावतपळत कॅसेट्स इंजेस्ट करत होती. मग जाऊन जेवणार होती. कारण आत लगेचच एंटरटेंनमेंन्टचा शो होता. त्यानंतर टॉकशो, परत टेलीशॉपिंग, त्यामुळे निवांतपण होता, मग मीपण इतर मित्रांसारखाच न्यूजरूमचा एक कोपरा पकडून काहीतरी महत्वाचं करत आहे, असं दाखवत बसलो. अनंन्या मोकळाझाली होती. शुटवर कायकाय झालं, ते तिला सांगायचं होतं. बाकीचे सटकले. मीच तिला भेटलो.
ती धम्माल सांगत होती, आज मी सुधीर कराडकरला भेटले. त्यांनी मला बाईटपण दिला. मी त्यांचा नंबर घेतला. परत तिथे एक फोटोग्राफर होता त्याच्यासोबत माझं चांगलंच जमलं. तो कँलेंडरवाल्या अमल कसबेकरांकडे फोटोग्राफी शिकलाय. त्याची मॉडेल आणि सिरीअलमधल्या ब-याच अँक्ट्रेसशी ओळख आहे. तेवढ्यातच मागून प्रज्ञाचा आवाज आला, असे कोणालापण शुटवर नंबर देत जाऊ नकोस. तू इंटर्न आहेस रिपोर्टर नाहीस. तुला वाटतं तितकं सोप्प नाही. अनंन्याचं उत्तर तयार होतं, मी अननोन नंबर वरून कॉल उचलत नाही. आणि मी समर्थ आहे असल्या गोष्टींना तोंड द्यायला. मी मनातल्या मनात म्हटलं, जाऊदे, आपल्याला काय.
दुपारची बुलेटीन ऑन एअर जायला अजून अर्धातास होता. बातम्यांचा क्रम काय असावा, हे बुलेटिन प्रोड्यूसर ठरवत होते. बाईट शोट्स कोणते लागणार हे कन्फर्म करून घेत होते. तेवढ्यात सरकारी कॉलेजातल्या रेसिडण्ट म्हणजे शिकाऊ डॉक्टरांचा मोर्चा आझाद मैदानात न थांबता मंत्रालयाकडे जाणार, अशी बातमी डेस्कला थडकली. लागलीच एक इंटर्न पाठवून द्यायची तयारी सुरु झाली. मी म्हटलं, मी जातो बाकी सगळे तोंड लपवूनच फिरत होते. मी निघायच्या तयारीत होतो. डेस्कवरच्या मॅडम ब्रिफिंगदेत होत्या. तिथे नलेश म्हत्रे मंत्रालयाच्या बिटवर आहेतच. पण तुला आझाद मैदानात जायचं आहे.पुढच्या सुचना तुला फोनवरून देऊच. तुझा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करून जा. मी पटापट नंबर सेव्ह केला. लायब्ररीत गेलो. शूटसाठी दोन कॅसेट्स घेतल्या. त्याजऊन कॅमेरामनला दिल्या.त्यानी कॅमेरा आऊट केला. ट्रायपॉड मला घ्यायला सांगितला. मी पायलटनी भरारी घ्यायच्या आदेशाची वाट बघावी तसा ड्रायव्हरच्या निघण्याची वाट बघत होतो. गाडी लॉजीस्टीक डिपार्टमेंटनी आगोदरच लाईनअप करून ठेवली होती. कॅमेरामनला माझ्याशी बोलण्यात फारसा इंट्रेस्ट नव्हता. गाडी सिएसटी स्थानकच्या जवळ आली. कॅमेरामननी गाडीतूनच कॅमेरा चालू केला. मला बुम नीट धरायला सांगितला. मी हुशारीनंच त्या गर्दीत शिरलो. कोणीतरी सह आयुक्त बाईट देत होते. मी त्या गर्दीतून पुढे जात त्यांच्या तोंडाशी आमचा बुम धरला.
मेडिकलचे विद्यार्थी शांतपणे आपला मोर्चा  आझादमैदानाबाहेर मंत्रालयाच्या दिशेने नेणार होते.  पोलिसांनी त्यांना रखण्याची सगळी तयारी केली होती. तेवढ्यात माझा फोन वाजला. रुपेश हळबे म्हणून कोणीतरी मोर्चेवाल्यांचा लीडर होता. त्याचा बाईट घ्यायचा होता. मी त्याला शोधून काढलं. बूम तोंडाजवळ जाताच तो बोलू लागला, आम्हाला बाराबारा तास ड्युटी करावी लागते. लोखो रुपये फी भरतो आम्ही पण आम्हाला स्टायपेंड मिळतो चार हजार, वैगेरे वैगेरे... नव्यानेच अँप्रन घातलेल्या आणि अजून डॉक्टर व्हायला काही वर्ष असलेल्या मुली(भावी डॉक्टरीणबाई) मोर्च्यात मिरवत होत्या.त्यांची कॅमे-यामेर येण्यासाठी चाललेली केवीलवाणी धडपड लगेच लक्षात येत होती.
मला जोरात लागली होती. म्हणून मी बुम कॅमेरामनकडे देऊन जवळच्याच मुतारीत जाऊन हलका होऊन आलो. समोर गर्दी होती. तेवढ्यातच पोलिसांनी काहीजणांना उचलायला सुरवात केली. घोषणाबाजी, गडबड गोंधळ सुरू झाला. मला कॅमेरामन दिसत नव्हता. मी त्याला शोधत होतो. तेवढ्यात मागून पोलिस आले. त्यांनी माझ्या कॉलरला हातघालून खेचायला सुरवात केली. नशीब कॅमेरमननी ते पाहिलं ओ, ते मीडियावाले आहेत. असं तो ओरडतच सांगू लागला. पोलिसांनी मला सोडलं.
मी हा प्रसंग ऑफिसमध्ये सांगितला, तेंव्हा सगळे हसत होते. अरे हा पण इंटर्न आहे. तेपण इंटर्न, कुणीतरी बोललं. मी काहीच बोललो नाही, नुसता हसून गप्प बसलो. मी घाईगडबडीत मला जमेलतशी स्क्रिप्ट लिहून दिली. पहिल्याच दिवशी मी आणलेली बातमी नऊच्या बुलेटिनला लागणार होती. मी स्वतःला जरा हिरोच समजत होतो. नऊ वाजायच्या आगोदर घरी पोहोचायचं होतं.
 या पत्रकारसाहेब, काकांनी माझं स्वागत केलं. माझा चुलतभाऊ विवेक हातात बूम घेतल्याची अंक्टींग करत माझ्यासमोर आला. कैसा लग रहा है आपको ? कैसा रहा आपका पेहला दिन ?’ त्यानं विचारलं.
मी पण खोटा भाव खात म्टलं नो कमेंट्स. तसे घरातले सगळे हसायला लागले. जेवताना आम्ही सगळ्यांनी मिळून माझी बातमी बघितली. मी नागपूरला घरीपण सगळ्यांना बघायला सांगितली.  जेवल्यानंतर मी विवेक बरोबर चालायला बाहेर आलो. तो त्याच्या मित्रांना माझं कौतूक सांगत होता. त्याचे मित्र म्हणाले आता बाटली फोडली पाहिजे. मी म्हटलं हो नक्की. आणि आम्ही पुढे आलो. त्याने विचारले. तुला स्टायपेंड किती मिळणार आहे. मी म्हटलं शून्य रुपये. वर येण्याजाण्याचा खर्च ही आपणच करायचा. तो माझ्याकडे बघतच म्हणाला, अरे तू डॉक्टरांच्या स्टायपेंडच्या बातम्या देणार. तुमच्या स्टायपेंडच्या बातम्या कोण देणार ? त्याचं काय ?’ मी म्हटलं जाऊदे मी संपादक झालो की चित्र बदलेन. तो हसला पण मी हसू शकलो नाही. या प्रश्नाचं उत्तर माझाय्कडे नव्हतं तसंच माझ्या इंटर्न मित्रांकडेही नव्हतं. त्यांना या प्रश्नाशी काही घेणं देणं ही नव्हतं. दीपक पत्रकारिता सोडून आयएसची तयारी करायला लागला होता. प्रज्ञा अंडव्हर्टायझींगमध्ये जाणार होती. अनंन्याला मॉडेल बनायचं होतं. मला मात्र पत्रकारितेशिवाय दुसरं काहीच ऑप्शन दिसत नव्हतं. विवेक ने विचारलेला एकच प्रश्न नाही असे अनेक प्रश्न होते ज्यांची उत्तरं माझ्याकडे नव्हती. पत्रकार मी होणार होतो, पण आज विवेकनी मला प्रश्न विचारून निरुत्तर केलं होतं. पण मला ही त्या प्रश्नाचं काहीच घेणदेण नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर फक्त प्राईम टाईम बुलेटिनला दिलेली माझी बातमीच नाचत होती. ती आवून आठवून मी खुष होत होतो.

काही शब्दांविषयी
टिकर – न्यूज चॅनल्समध्ये टिव्हीच्या पडद्यावर सर्वात तळाला दिसणारी थोडक्यात बातम्यांची पट्टी.
बीएमएम – बॅचलर ऑफ मास मीडिया. पत्रकारितेची डिग्री.

रविवार, 11 नवंबर 2012

न्यूज रूम लाइव्ह संपादक: सचिन परब


हे मनापासून निमंत्रण आहे, एका दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्याचं. 
पण हा दिवाळी अंक थोडा वेगळा आहे. 
न्यूजरूम लाइव्ह, टीव्हीवाल्या पत्रकारांचा दिवाळी अंक. यात टीव्हीत काम केलेल्या, करत असणा-या १८ जणांनी कथा लिहिल्यात. 
यातून टीव्ही जर्नालिझमचा एक अनोखा चेहरा आपल्या सगळ्यांसमोर येतोय. 

प्रकाशन होईल आजही कार्यरत असणारे मुंबईतील सर्वात जुने कॅमेरा असिस्टण्ट 
राजन पिल्लई यांच्या हस्ते 

मराठी टीव्ही पत्रकारिता भविष्यात कशी असेल? 
या विषयावर लाइव्ह पॅनल डिस्कशन.
सहभागी होतील, 
भारतकुमार राऊत, ज्येष्ठ संपादक,  
राजीव खांडेकर, संपादक, 
चर्चा संचलनः अमोल परचुरे 

सोमवार, १२ नोव्हेंबर २०१२
संध्याकाळी ४ वाजता
मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान, सीएसटीजवळ. 

अंकाचे मानकरी आहेत... नरेंद्र बंडबे (आयबीएन ७), प्रशांत जाधव (झी २४ तास), अमोल जोशी (झी २४ तास), कमलेश देवरूखकर, प्रसाद काथे (एनडीटीव्ही), नीलेश खरे (एबीपी न्यूज), माणिक मुंढे (एबीपी माझा), विठोबा सावंत ( झी २४ तास), कमलेश सुतार (हेडलाइन्स टूडे), गिरीश अवघडे (दिव्य मराठी), सुरेश पाटील (प्रहार), अनंत सोनवणे (झी २४ तास), रवी तिवारी (मी मराठी), मनोज भोयर (समय), कॅमेरामन किशोर पगारे, संजय सिंग, पराग पाटील (प्रहार), केशव घोणसे (झी २४ तास, नांदेड), रत्नाकर पवार (पत्रकारिता विद्यार्थी), सुबोध पाध्ये आणि संपादक सचिन परब. 

मीडिया आणि समाज यांना एकमेकांजवळ आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. 
तुम्ही या प्रयत्नांत सहभागी व्हावं, ही विनंती. 
रत्नाकर पवार