गुरुवार, 28 मई 2015

व्हेंटिलेटरवरची ‘गॉन केस’

  • रत्नाकर पवार , मुंबई (robin.paar@rediffmail.com) -
    तुमचा कोणी मित्र आहे, जो प्रेमात पडला आहे ? त्याचं तिच्यावर मनापासून प्रेम आहे? पण तिचं त्याच्यावर नाही. अशा मजनू मित्रांबाबत तुमचं मत काय आहे? त्यांना लांबूनच रामराम करता? समजवायचा प्रयत्न करता? की टाळता? प्रेम हे सगळ्यांच्याच आयुष्यात होतं. पण समजा काही कारणांनी ते सक्सेस नाही झालं, किंवा त्याला, तिला यामुळे डिप्रेशन आलं तर काय करता? अशावेळी तो किंवा ती टोकाची भुमिका घ्यायला जातात. ज्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात.
    माझे अनेक मजनू मित्र होते. ज्यांचं प्रपोजल नाकारलं गेलं. अफेअर तुटलं. मग या मंडळींना सगळे टाळायचे, कारण प्रेमात आंधळं होऊन यांनी मित्रमंडळींकडे लक्षच दिलं नाही. प्रेमभंग झाला आणि त्यांचे डोळे उघडले. मग काय, तिच्यासाठी मित्रांना वेटिंगवर ठेवणारा मजनू आपली अधुरी काहाणी सांगण्यासाठी मित्रांचा वेट करायचा. मग मित्रपण इसरुटकी सभीलायने व्यस्त असल्याचं दाखवायचे. माझा एक मित्र तिच्या बाबत सिरीअस नाही, गॅसवर नाही तर चक्क व्हेंटिलेटरवर होता. त्याला कोणीही जवळ उभं करत नव्हतं. त्यांनी मला राहून राहून अनेकदा त्यांची अधुरी कहाणी ऐकवली. रोज काही कारणांनी तिच्या आठवणी सांगायचा. प्रेमभंग झाल्यावर त्याने नोकरीही सोडली होती.
    त्याला मी समजवायचा प्रयत्न केला की बाबारे प्रेम त्यांच्यावरच करावं जे आपल्यावर करतात. तर तो म्हणायचा, ‘मित्रा हेच तु तिला जाऊन सांग’. वर म्हटल्याप्रमाणे केस अगदी हाताबाहेर गेलेली होती. सहानुभूती म्हणा किंवा समदुखी: म्हणा, मी त्याचं बोलणं निमुटपणे ऐकून घ्यायचो. एकदा असंच बराच वेळ तो कान खात होता. तो तिला परत विचारायला जाणार होता. तिला त्याच्यासोबत राहू नकोस, असा प्रेमळ सल्ला तिच्या निकटवर्तियांनी दिला होता. त्याने मला विचारलं बोलू कारे तिच्याशी? विचारू का तिला परत ‘ब्रेकअप के बाद’बद्दल? मी म्हटलं बोल पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या आईबापानी एका मुलीच्यामागे मरण्यासाठी तुला जन्म दिला नाही. आपल्याच तंद्रीत जगणं रात्री अपरात्री फोन करणं यामध्ये किती दिवस वाया घालवणार आहेस?
    हे  ऐकून पठ्ठ्याचे डोळे उघडले व्हेंटिलेटर वरची गॉनकेस आशादायी वाटू लागली. दुसरा दिवस उजाडला, नेहमीप्रमाणे तो तिच्या कॉलेजबाहेर वाट पाहात होता, स्वत:च्या समाधानासाठी तो तिच्यापुढे जाऊन उभा राहिला. त्याने तिला थांबवलं तिने अपेक्षेप्रमाणे नाहीच म्हटलं. याला आईबाप आठवले. हा मागे फिरला, बारकडे वळालेली पावलं पुन्हा घराकडे वळाली, घरी जाताना याने एक फॅमेलीपॅक आईसक्रिम घेतलं आणि नकार आई वडलांसोबत साजरा केला.
    चक्क दोन दिवसांनी मला फोन करून सांगितलं, की मित्रा मी तिच्यातून पुर्णत: बाहेर पडलो आहे. त्यादिवशी विचारल्यावर ती नाहीच म्हणाली. मग बारमध्ये न जाता घरी येऊन आईबाबांसोबत आईसक्रिम खाऊन सेलिब्रेट केलं. याचं क्रेडिट मात्र त्याने मलाच दिलं म्हणून कथेत त्याचं नाव न घालून मी त्याची परतफेड करत आहे. कारण अशा अनेक व्हेंटिलेटर वरच्या गॉन केसेसना यातून धडा मिळावा.